Alexander graham bell biography resumen en marathi


बेल, अलेक्झांडर ग्रॅहॅम : (३ मार्च १८४७-२ऑगस्ट १९२२). अमेरिकन भौतिकीविज्ञ व संशोधक. दूरध्वनीच्या शोधाबद्‌दल सुप्रसिद्ध [à दूरघ्वनीविद्या]. या शोधामुळे संदेशवहन तंत्रविद्येत एक नवे युग सुरू झाले. बेल यांची आई आणि पत्नी बहिऱ्या असल्याने त्यांनी बहिऱ्यांना बोलण्यास शिकविण्याचे कार्य आयुष्यभर आस्थेने केले.

बेल यांचा जन्म एडिंबरो (स्कॉटलंड) येथे झाला. त्यांचे वडील वाचाक्रिया विज्ञानाचे व वाचाशास्त्राचे तज्ञ आणि आजोबा वाचाशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचे प्रारंभिक शिक्षण एडिंबरा विद्यापीठात झाले. वयाच्या सोळाव्या वर्षी एल्जिन येथील वेस्टर्न हाऊस ऍकॅडमी या संस्थेत वाचाशास्त्र व संगीत यांचे निदेशक म्हणून ते काम करू लागले. १८६५ मध्ये पुढील शिक्षणसाठी ते लंडनयेथील युनिव्हर्सिटी कॉलेज येथे गेले. तेथे त्यांनी बोलताना तोडात होणाऱ्या ⇨अनुस्पंदनाचा  अभ्यास केला. पुढे प्रकृती स्वास्थ्याकरिता १८७० मध्ये ते आई वडिलांबरोबर ब्रॅंटफर्ड (आँटॅरिओ, कॅनडा) येथे गेले. १८७१ साली बोस्टन येथील सेरा फुलर्स स्कूलमध्ये ते बहिऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करू लागले. व पुढील वर्षी त्यांनी बहिऱ्यांच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी बोस्टन 

येथे एक विद्यालय काढले. १८७३ मध्ये बोस्टन विद्यापीठात वाचाक्रिया विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. बहिऱ्या मुलांना शब्दोच्चार शिकविण्यासाठी ते दृष्य प्रयुक्तींचा उपयोग करीत असत.

टॉमस वॉटसन यांच्याबरोबर तारायंत्र विद्या व दूरध्वनी विद्या या विषयांत त्यांनी संशोधन केले. एकाच तारेवरून एकाच वेही अनेक संदेश प्रेषित करणाऱ्या तारायंत्र प्रणालीकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. ध्वनीच्या तीव्रतेनुसार हवेच्या घनतेत होणाऱ्या बदलांप्रमाणे तारेतुन वाहणाऱ्या विद्युत प्रवाहात बदल करून ध्वनी वहन करता येईल, असे १८७४ मध्ये त्यांना दिसून आले. बरेच प्रयो गकेल्यानंतर १८७६ मध्ये त्यांनी चुंबकीय दूरध्वनी हे उपकरण तयार केले. या उपकरणात पुढे टॉमस एडिसन व इतर अनेक शास्त्रज्ञांनी सुधारणा करून त्याला आजचे स्वरूप प्राप्त करून दिले. जे. पी. राइस या जर्मन शास्त्रज्ञानी बेल यांच्या पूर्वीच (१८६०मध्ये ) डुकराच्या कर्णपटलाचा उपयोग करून एक व्यवहारोपयोगी दूरध्वनी तयार करण्याचा प्रयत्न केला होता. १४ फेब्रुवारी १८७६ रोजी बेल यांनी दूरध्वनींच्या एकस्वाकरिता (पेटंटकरीता) अर्ज केला. त्याचदिवशी इलाईशा ग्रे या दुसऱ्या संशोधकांनीही दूरध्वनीच्या एकस्वाकरीता अर्ज केला होता. ७ मार्च १८७६ रोजी बेल यांना एकस्व देण्यात आले९ तथापि कायदेशीर बाबीसंबंधी बराच वादविद झाल्यानंतर आणि अनेक शास्त्रज्ञांनी व प्रतिष्ठित व्यक्तिंनी बेल यांच्या बाजूने साक्ष दिल्यावर १८९३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा एकस्वाचा हक्क मान्य केला.

बेल यांनी १० मार्च १८७६ रोजी प्रथमतःच पहिले वाक्य तारेतून विद्युत्‌ प्रवाहाद्वारे प्रेषित केले. त्यानंतर दोन महिन्यांनी अमेरिकन ऍकॅडमी ऑफ आर्टस्‌ ऍन्ड सायन्सेस या संस्थेच्या बोस्टन येथील सभेत त्यांनी दूरध्वनीचे पहिले प्रात्याक्षिक करून दाखविले. एक महिन्यानंतर फिलाडेल्फिया इंटरनॅशनल सेंटेनियल एक्स्पोझिशन या प्रदर्शनातील प्रात्यक्षिकंमुळे दूरध्वनीला पुष्कळच प्रसिद्धी मिळाली आणि बेल यांना या प्रदर्शनात पुरस्कार प्रमाणपत्र देण्यात आले. जुलै १८७७ मध्ये बेल टेलिफोन कंपनीची स्थापना झाली आणि त्याचवर्षी इंग्लंड फ्रान्स मध्येही बेल सांनी दूरध्वनीचा प्रसार केला. बेल व बेस्टर्न युनियन या कंपनीने १८७९ मध्ये संयुक्त कंपनी स्थापन केली. १८८४ साली बेल कंपनीने बोस्टन व न्यूयॉर्क यांच्या दरमयान पहिले दूर अंतरावरील दूरध्वनी यंत्रणा उभारली आणि इतर अशाच यंत्रणा चालविण्यासाठी १८८५ मध्ये बेल व इतरांनी मिळून द अमेरिकन टेलिफोन ऍन्ड टेलिग्राफ कंपनीचर स्थापना केली. फ्रान्सने १८७७ साली बेल यांना ५०,००० फ्रॅंकचे व्होल्टा पारितोषिक दिले. बेल यांनी १८८० साली या रकमेतुन वॉशिंग्अन येथे व्होल्टा लेबोरेटरी स्थापन केली. या प्रयोगशाळेत त्यांनी फोटोफोन, श्रवणमापक, ग्रामोफानमध्ये सुधारणा इ. विषयी शोध लावले. प्रकाशशलाकेद्वारे ध्वनीवहन करणाऱ्या फोटोफोन या उपकरणाचे तत्व (प्रकाशध्वनिकी परिणाम) बेल यांनी सी. एस. टेंटर यांच्या बरोबर संशोधन करून शोधुन काढले. एखाद्या पदार्थावर अंतरिक (अधुनमधुन ठराविक कालावधीनी) प्रकाशकिरण टाकला, तर त्यात प्रकाश किरणाच्या अंतरिकतेनुसार ठराविक उच्चतेचा ध्वनी निर्माण होतो, असे त्यांना आढळून आले तथापि या तत्वाचा त्यावेळी व्यावहारिक उपयोग होऊ शकला नाही. १९७० सालानंतर मेलनक्षम रंजकद्रवययुक्त लेसरच्या [→लेसर] रूपाने उच्च एकवर्णी व ज्याची तरंगलांबी सतत बदलता येईल असा उद्गम उपलब्ध झाल्याने या तत्वाचा विविध क्षेत्रांत (उदा., जैवनमुन्यांचा अभ्यास, विविध पदार्थांच्या पृष्ठभागाचा अभ्यास इ.) आता उपयोग करण्यात येत आहे. बेल यांनी तयार केलेल्या लाखेच्या दंडगोलाकार आणि मेणाच्या तबकडीच्या आकाराच्या व दंडगोलाकार ध्वनीमुद्रीकांचा कोलंबिया ग्रामोफोन कंपनीने उपयोग केला. त्यातुन मिळालेल्रू नयातुन बेल यांनी वॉशिंग्टन येथे बहिरेपणाच्या अभ्यासाकरिता व्होल्टा ब्युरो ही संस्था स्थापन केली. दोनापेक्षा अधिक स्तनाग्रे असणाऱ्या मेंढ्यांची निर्मिती, विजेता वैद्यकीय उपयोग इ. अनेक विषयांतही त्यांनी लक्ष घातले. १८९५ नंतर त्यांनी विमानविद्येत विशेष रस घेतला. त्यांनी एस. पी. लॅंग्ली यांना उड्‌डाण प्रयोगांत आर्थिक मदत केली. विविध आकारांच्या पतंगांवर प्रयोग करून १९०३ मध्ये चतुःपृष्टकी पतंगाचा शोध लावला आणि १९०७ मध्ये एरियल एक्सपिरिमेंटल असोसिएशनची स्थापना केली. बेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंखपश्च पडदी नियंत्रध पद्धती [ àविमान] उपयोगात आणली आणि उड्‌डाण यंत्रातील संतुलन प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने संशोधन केले.

बेल यांनी अनेक शास्त्रीय व्याख्याने दिली आणि आनुवांशिक बहिरेपणा व अन्य विषयांवर शंभराहून अधिक निबध व लेख लिहिले. १८८२ मध्ये त्यांनी सायन्स या नियतकालिकाची कल्पना मांडली आणि १८८३ साली हे नियतकालिक प्रकाशित होण्यास सुरूवात झाल्यावर पहिले आठ वर्षे त्यांनी त्याकरिता मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली. हे नियतकालिक पुढे अमेरिकन असोसिएशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे अधिकृत नियतकालिक म्हणून गणले जाऊ लागले. १८९८-१९०४ या काहात ते नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटीचे अध्यक्ष होते. ही संस्था संघटित करण्याबरोबरच त्यांनी तिला आर्थिक साहाय्यही दिले. १८९७ मध्ये स्मिथसोनियन इन्स्टिट्युटचे रिजंट म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८७५-१९२२ या काळात त्यांनी दूरध्वनी संदेशवहन व बहिऱ्यांचे शिक्षण या संबंधी एकूण ३० एकस्वपत्रे मिळाली. १८८२ त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. त्यांनी अमेरिकन असोसिएशन टू प्रमोट द टीचिंग ऑफ स्पीच टू द डेफ ही संस्था स्थापन केली. पुढे या संस्थेचे अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल असोसिएशन फॉर द डेफ असे नामांतर करण्यात आले. ते नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस (१८८३) व इतर अनेक शास्त्रीय संस्थांचे सदस्य होते. ते बेडेक (नोव्हास्कोशा, कॅनडा) येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.

&#;

आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..

You Might Also Like

संधिप्रकाश

कर परिणाम

क्यूरी, मारी

वातावरणीय प्रकाशकी